नवी दिल्ली । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओने (WHO) 7 भारतीय कफ सिरप कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. यामुळे भारतीय औषध निर्मिती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत ही कारवाई केली आहे
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, आफ्रिकन देश गांबियासह जगभरातील अनेक देशांमध्ये कफ सिरपमुळे 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओचा असा विश्वास आहे की, या लोकांचा कफ सिरप प्यायल्यानंतर मृत्यू झाला आहे. या लोकांच्या मृत्यूला भारतातील 7 कफ सिरप कंपन्या जबाबदार असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी या सात कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकून दिले.
गेल्या काही महिन्यांत, नायजेरिया, गांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनेक लोकांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. या सर्वांचा मृत्यू कफ सिरप प्यायल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले होते. डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारत आणि इंडोनेशियामधील फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या 20 पेक्षा अधिक कफ सिरपची चाचणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर डब्ल्यूएचओने भारतात तयार होणाऱ्या या कफ सिरपबाबत अलर्टही जारी केला आहे.
विषारी कफ सिरपच्या विक्रीबाबत डब्ल्यूएचओने आतापर्यंत 9 देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे. कफ सिरपव्यतिरिक्त डब्ल्यूएचओने व्हिटॅमिन तयार करणाऱ्या कंपन्यांचीही तपासणी केली आहे. डब्ल्यूएचओने भारत आणि इंडोनेशियामध्ये कफ सिरप आणि व्हिटॅमिन तयार करणाऱ्या 20 कंपन्यांची चौकशी करत आहे. या कंपनींच्या औषधामध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.
दरम्यान, भारताच्या औषध नियंत्रकाने नोएडाच्या मेरियन बायोटेक, चेन्नईच्या ग्लोबल फार्मा, पंजाबचे क्यूपी फार्माकेम आणि हरियाणाच्या मेडेन फार्मास्युटिकल्ससह इतर अनेक फार्मा कंपन्यांची देखील तपासणी केली होती. या तपासणीत काही अनियमितता आढळून आल्याने औषध नियंत्रकाने या कंपन्यांच्या कामकाजावर बंदी घातली होती.