राज्यातील तलाठी पदभरतीच्या परीक्षेसाठी आज १५ जून रोजी लिंक खुली होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती न झाल्याने या भरतीसाठी जवळपास ५ लाख उमेदवार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. दरम्यान एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार असून साधारण गटासाठी १ हजार, तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.
राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांच्या ४ हजार ६४४ पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागण्यात आल्याचे समजते तर आज १५ जून रोजी लिंक खुली होण्याची शक्यता आहे.
या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. यासंदर्भात सरकारला कळविण्यात आले आहे.तलाठी पदाच्या परीक्षेचे प्रारूप तयार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नाही. त्यामुळे येत्या १५ जूनपासून परीक्षेच्या अर्जाच्या नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानंतर २१ दिवसांची मुदत परीक्षा अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार आहे.