नवी दिल्ली: मान्सून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजेच खासगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तविलेल्या नव्या अंदाजानुसार देशात येत्या चार आठवड्यात कमी प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढणार आहे.
स्कायमेटने म्हटले आहे की, पुढील ४ आठवड्यांसाठी म्हणजे ६ जुलैपर्यंत कमी पाऊस पडेल. जून हा पेरणीपूर्व कामे आणि पेरणीचा महिना आहे. याच काळात कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढणार आहे.
अनुकूल चिन्हे नाहीत :
मान्सूनचा पाऊस साधारणपणे १५ जूनपर्यंत महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारचा अर्धा भाग व्यापतो. मात्र, यंदा तशी परिस्थिती नाही. मान्सूनची उपस्थिती ईशान्य आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंत मर्यादित आहे. नजीकच्या भविष्यात बंगालच्या उपसागरावर हवामान प्रणाली अनुकूल होण्याची चिन्हे नाहीत.
मान्सूनच्या प्रगतीत अडथळे
देशात मध्य आणि पश्चिम भागात हंगामाच्या सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नैऋत्य मान्सून एक आठवडा उशिराने ८ जून रोजी केरळमध्ये पोहचला. अरबी समुद्रातील चक्रीवादळ बिपोरजॉयने केरळमध्ये मान्सून सुरू होण्यात प्रथम विलंब झाला. आता पावसाच्या प्रणालीमध्ये अडथळे येत आहेत, असे स्कायमेटने म्हटले आहे.