कोल्हापूर – मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये, यासाठी नामविस्तार करण्याची मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.
तसंच कोल्हापुरातील ‘शिवाजी’ विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी या पत्राद्वारे केली आहे. सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार आवश्यक असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच नावांमधील एकेरी उल्लेख टाळण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. संभाजीराजे यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. मराठा समाजातील तरुणांनी समाजात दंगल घडवण्याच्या उद्देशानं आंदोलन केलं नव्हतं; त्यामुळं या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.