मुंबई :बिपरजॉयचे चक्रीवादळ पुढील 6 तासांत अत्यंत तीव्र होणार असून त्याच रूपांतर चक्री वादळात होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. मात्र, तो गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार नसून तो पोरबंदर किनार्यापासून 200-300 किमी अंतरावर जाण्याचा अंदाज आहे, परंतु 15 जूनपर्यंत गुजरातमध्ये वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात असून १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर होणार आहे. मात्र मुंबईला त्याचा धोका नाही. या वादळामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ कुठे पोहोचले?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकण्यापूर्वी, उत्तर-ईशान्य दिशेने हळूहळू सरकण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ बिपरजॉय सध्या पोरबंदरपासून 600 किमी दूर आहे. जसजसे ते पुढे जाईल तसतसे पोर्ट सिग्नल अलर्ट त्यानुसार बदलतील.
मच्छिमारांना पुढील 5 दिवस म्हणजे 15 जूनपर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. मासेमारीचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
भारतीय हवामान विभागाने मान्सूनची प्रगती पाहून राज्यात कधी येणार? याचे उत्तर दिले आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 48 तासांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखीन 10 दिवसांची प्रतीक्षा असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करु नये, असा सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे.