नवी दिल्ली : देशभरात अनेक भागात उष्मा आणि उष्णतेची लाट सुरू आहे. तसे पाहता लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. भारतीय हवामान खात्याने (IMD) उष्णतेने त्रस्त असलेल्या लोकांना मोठी बातमी दिली आहे. पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले आहे त्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे सांगितले.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी ‘स्कायमेट वेदर’ने सांगितले की, केरळमध्ये मान्सून 8 किंवा 9 जून रोजी दाखल होऊ शकतो. या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. ते म्हणाले, अरबी समुद्रातील अशा शक्तिशाली हवामान प्रणालींचा अंतर्गत भागात मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो. चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मान्सून मंद गतीने किनारी भागात पोहोचू शकतो, परंतु पश्चिम घाटाच्या पलीकडे जाण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागेल. स्कायमेटने यापूर्वी 7 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, असे म्हटले होते की तो तेथे तीन दिवस आधी किंवा नंतर पोहोचू शकतो.
नैऋत्य मान्सून साधारणत: १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. त्याच्या येण्याच्या वेळेत सात दिवसांचा फरक असू शकतो. मेच्या मध्यात, आयएमडीने सांगितले होते की मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तविला होता.