डेराबर्डी निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, दि. ३१ – सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांची शासकीय निवासी शाळा डेराबडी, धुळेरोड, चाळीसगांव, जि. जळगांव मध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी या शैक्षणिक वर्गासाठी (सेमी इंग्रजी) रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शासन निर्णय दिनांक 29 जुन, 2011 नुसार अनुसुचितजाती अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग या प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी या शैक्षणिक वर्गात शिकणा-या प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच प्रवेशित विद्यार्थ्याना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, गणवेश, अनुषंगिक इतर सोयी, सुविधा शासनामार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.
या निवासीशाळेची इमारत प्रशस्त असून विविध इंग्रजी
उपक्रम, स्वतंत्र संगणक कक्ष व स्वतंत्र अभ्यासकक्ष, मनोरंजनासाठी LCD टि.व्ही., भव्य क्रिडांगण, विविध क्रिडा साहित्य, प्रशिक्षित शिक्षक वर्ग व कर्मचारीवृंद आहेत.
पालकांनी या निवासी शाळेत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी जातीचा दाखला, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, राहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, मागील वर्षांचे गुणपत्रक, छापील प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
निवासीशाळेत प्रवेशासाठी अर्ज विनामुल्य वाटप सुरु आहेत. प्रवेशासाठी मुख्यध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा डेराबर्डी, धुळेरोड, चाळीसगांव, जि. जळगांव यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.