जळगाव : मागील काही काळात जळगावात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. अशातच जळगाव जिल्हा पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवून एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईत ४ गावठी कट्टे, ५ तलवारी, दोन चोपर, १ चाकू आणि जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी या कारवाईत १० जणांना अटक केली आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून दरोडा, खून, जबरी चोरी, प्राणघातक हल्ला याप्रमाणे भविष्यात मोठे गुन्हे घडण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना तसेच अनर्थ टळला आहे. या संशियतामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी बोलताना दिली आहे. सोशल मीडियावर सध्या हातात शस्त्र घेऊन फोटो काढून तसेच व्हिडिओ बनवण्याची तरुणांमध्ये क्रेझ आहे. मात्र, असं करणं हा गुन्हा असून संबंधित व्हिडिओ करणाऱ्याला जेलची हवा खाण्याची वेळ येऊ शकते असा इशारासुद्धा पोलीस अधिक्षकांनी दिला आहे.