पुणे : देशभरातील जनतेसोबत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मे महिना उजाडला ही जवळपास प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहतो, भारतामध्ये पहिला मान्सून केरळमध्ये दाखल होतो, यानंतर त्याच्या प्रवासाला सुरूवात होते, यंदा भारतात मान्सून कधी दाखल होणार याबाबत पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे.
यावर्षी देशात मान्सून उशीरा दाखल होणार आहे. मान्सून केरळमध्ये 1 जूनऐवजी आता 4 जूनपर्यंत दाखल होणार आहे. केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल होत असल्यामुळे महाराष्ट्रालाही पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरवर्षी 22 मे रोजी मान्सून देशात दाखल होत असतो. 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमनच उशीराने होणार आहे. मोचा चक्रीवादळ आणि बदललेल्या वातावरणामुळे मान्सून दाखल होण्याची तारीख पुढे गेल्याचे सांगितले जात आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिरा दाखल होणार असल्यामुळे केरळमध्ये देखील तो उशीरा दाखल होणार आहे. तळकोकणात मान्सून 7 जून रोजी दाखल होईल. तर मुंबईमध्ये 11 जूनला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी अंदमानमध्ये मान्सून 15 मे रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण मोचा चक्रिवादळामुळे मान्सूच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. अशामध्ये मान्सून 19 ते 20 मेपर्यंत दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोचा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत चालली आहे त्यामुळे त्याचा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होत आहे. या चक्रीवादळामुळे मान्सून अंदमानात उशीराने दाखल होणार असल्यामुळे त्याच्या पुढच्या दिशेच्या वाटचालीवर परिणाम होण्याचे सांगितले जात आहे.