जळगाव । मागील काही दिवसापासून अवकाळीच्या तडाख्यामुळे बहुतांश भागातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जात होते. मात्र आता येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
उत्तर मध्य भागासह देशातील बहुतांश भागात अचानक उष्णता वाढली आहे. परिस्थिती अशी झाली की, केवळ 72 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील तापमान ५ अंश सेल्सियसवर वाढले.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात देशातील अनेक भागात कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच 13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्यामुळे तापमानात घट होणार नाही.
जळगाव तापणार
राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत असल्याने अचानक तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमान जास्त राहणार आहे. मे हिटचा तडाखा अनेक जिल्ह्यांना जाणवणार आहे. जळगावात तापमान पुन्हा 42 ते 43 डिग्री अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे. अकोल्यात ४२ अंश सेल्सियवर तापमान गेले आहे. जळगाव ४१, वर्धात ४० अंश सेल्सियस तापमान होते.