जळगाव : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात पाऊस होत आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घेतला आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, राज्यावरील अवकाळी ढग अजुन काही दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढच्या काही तासात मेघगर्जनेसह वादळी पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तर आज (दि. 29) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
एप्रिलच्या सुरूवातीपासून वादळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शुक्रवारी राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
या जिल्ह्यांना पुढचे काही तास महत्वाचे?
दरम्यान, जळगावसह धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड, परभणी, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांना पुढील ३ ते ४ तासात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढचे दोन दिवस वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.