छ संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं असून यात एकाच बुडून मृत्यू झाला आहे. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, या घटनेनं परिसर हादरला असून याबाबत पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. राजू प्रकाश भोसले (३५) असे अटक केलेल्या आरोपी पित्याचे नाव आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा भागात किरकोळ कौटुंबिक वादातून जन्मदात्याने बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकले.
या घटनेत नऊ वर्षांचा शिवम बचावला असून त्याचा लहान भाऊ श्रेयसचा (७) पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबिक वादातून नशेत असलेल्या पित्याने पोटच्या मुलांनाच विहिरीत फेकल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे.
या घटनेत मोठ्या मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले. मात्र 7 वर्षांच्या चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी राजू प्रकाश भोसले याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करण्यात येत आहे.