जळगाव : ऐन उन्हाळ्यात राज्यात गारपीटीसह वादळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. जळगाव जिल्ह्यात आधीच वादळी पावसासह गारपीटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार आज शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
ऐन उन्हाळ्यात पाऊस धो-धो कोसळत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले. सुरुवातीस काळ्या ढगांनी आकाश झाकून गेल्याने शहरावर अंधार जाणवू लागला. अचानक सोसाट्याचा वारा आल्याने अनेक ठिकाणी या वेगवान वाऱ्याचा सामना करणे कठीण गेले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले.
जळगाव जिल्ह्यात आजपासून 30 एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी आज दि २८ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.आणि काही वेळात गारपीटीला सुरुवात झाली यामुळे अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.