मुंबई- अवघ्या ८० तासांत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेल्यामुळं धक्का बसलेले भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासूनच नव्या सरकारवर टीका सुरू केली आहे. शपथविधीच्या दिवशी सरकारवर प्रादेशिक भेदभावाचा आरोप करणाऱ्या फडणवीस यांनी आज पुन्हा ट्विट केलं आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांऐवजी बहुमत सिद्ध करण्याविषयी खलबतं झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा शुक्रवारी शिवाजी पार्कवर ऐतिहासिक शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांनी हजारोंच्या साक्षीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य सहा मंत्र्यांनीही पद व गोपनीयतेची शपथ घेतली त्यानंतर संध्याकाळी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक झाली व त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय व चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.