नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून चोरट्यांनी राष्ट्रपती भवनात जलवाहिनीच्या कामासाठी ठेवलेल्या वाहिन्या (पाईप) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर खडबडून जागी झालेली पोलीस यंत्रणा चोरांचा शोध घेत आहे.
या प्रकरणी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पोलीस सूत्रांनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून जोरबाग परिसर ते राष्ट्रपती भवना परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवनच्या २३ आणि २४ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या संख्येनं वाहिन्या ठेवण्यात आल्या आहेत. चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जलवाहिनीच्या कामासाठी ठेवलेल्या वाहिन्या चोरीला गेल्याची शंका ठेकेदार कंपनीच्या मालकाला आली. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. राष्ट्रपती भवनमध्ये टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसाठी लागणारे पाईप चोरीला गेल्याचं समजताच पोलीस खडबडून जागे झाले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी चौकशी सुरू केली. येथील रस्त्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाल्याचं स्पष्ट झालं. कंटेनरमधून चोरी केलेले पाईप वाहून नेले जात असल्याचं सीसीटीव्ही चित्रणात दिसून आलं. मात्र, चोरटे कारमधून आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीनं पोलिसांनी कारची माहिती मिळवली. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीची माहितीही पोलिसांनी मिळाली. त्यानं दिलेल्या माहितीवरून बिहार, दिल्ली आणि अमेठीमधून तिघांना ताब्यात घेतलं. त्यांनी चोरीची कबुली दिली असून, पाईप मेरठमध्ये जाऊन विकल्याचं सांगितलं. त्यांनी कोर्टात हजर केलं असता, पोलीस कोठडी सुनावली आहे.