जळगाव : जळगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलणं झाल्यानंतर तरूणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलीय. कितेश गौतम बागडे (वय २०. रा, नाथवाडा, सिंधी कॉलनीजवळ, जळगाव) असं मृत तरुणाचं नाव असून कितेशने आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीय. घरात लग्नापूर्वी तरुणाची अंत्ययात्रा निघाल्याने कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी जवळील नाथवाडा येथे कितेश बागडे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या तो महाविद्यालयीन शिक्षण करत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. कितेश हा शनिवारी रात्री ९ वाजता घराच्या दुसऱ्या मजल्यावर असताना त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉल सुरू असताना कीतेश याने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे पण वाचाच..
राज्यात वीज कंपन्याचा झटका! आता ग्राहकांना भरावी लागणार ‘इतक्या’ महिन्यांची सुरक्षा ठेव
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु
सावधान… उन्हाळ्यात कुलर वापरतांना घ्या ही काळजी, अन्यथा….
कितेश याने गळफास घेतल्याचा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आली. त्यांनी मुलाचा गळफास घेतलेला मृतदेह पाहिला आणि जागीच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यावर शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेऊन कितेश याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणूका भंगाळे यांनी कितेशला मयत घोषीत केले. कितेशने आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण समोर आलेलं नाहीय.
विशेष बाब म्हणजे, २७ मे रोजी कितेशचे लग्न होणार होते. ज्या घरात महिनाभरानंतर सनई-चौघडे वाजणार होते. त्याच घरात लग्नापूर्वी तरुणाची अंत्ययात्रा निघाल्याने कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश होता. कितेश याने एवढ्या टोकाचा निर्णय का आणि कशासाठी घेतला? याचं कारण गुलदस्त्यात आहे. या घटनेनं बागडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.