जळगाव : राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून अनेक शहांमधील तापमानाचा पारा 40 अंशावर गेला आहे. यामुळे नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहे. अशातच उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढचे दोन पुन्हा राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची माहिती दिली आहे.
राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागच्या 10 दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी गारपीट झाल्याने रब्बी-उन्हाळी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त द्राक्ष, आंब्यासह इतरही फळपिकांना या गारपिटीचा दणका बसला आहे. याचबरोबर कांदा, टोमॅटो, कलिंगड आदी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
एप्रिलच्या सुरूवातीपासून उन्हाचा पारा वाढत असल्याने राज्यात तापमान वाढीचा उच्चांक होत आहे. मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी येथे 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची, तर अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव, अमरावती येथे तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे.
उर्वरीत राज्यात कमाल तापमान 34 ते 42 अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमान 19 ते 27 अंशांच्या दरम्यान आहे.