नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल हे ऐतिहासिक ठरले आहेत, यात काहीच शंका नाही. अनेक प्रकारे या निकालाने इतिहास रचले आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीमुळे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वबळावर पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
२०१४मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता मोदींनी पुन्हा एकदा असाच विजय मिळवला आहे. देशातील जनतेने १९८४नंतर एखाद्या पक्षाला प्रथमच इतके मोठे यश मिळवले आहे. ८४मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना जनतेने मोठा कौल दिला होता.
सध्याच्या आकडेवारीनुसार, एनडीएने ३५०हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. यामध्ये एकट्या भाजप पक्षाने ३००ची आघाडी मिळवली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा २८२ एवढा होता. तर, युपीएला फक्त ९० जागांवर आघाडी मिळवली आहे. २०१४प्रमाणे याही वर्षी नरेंद्र मोदींच्या वर्चस्वाने भाजपने बाजी मारली आहे. निकालाच्या आधी जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तोच अंदाज खरा ठरेल अशा पद्धतीने कल येत आहेत.
सक्षम नेतृत्वाचा विजय : राजनाथसिंह
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाहीने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला आहे आणि हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या चाणाक्ष व सक्षम नेतृत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी दिली.
ऐतिहासिक विजयाबद्दल रालोआवर अभिनंदनाचा वर्षाव करणारे अनेक टि्वट्स राजनाथसिंह यांनी आज केले. देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा रालोआला भव्य असा कौल दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर आणि नवभारताच्या उभारणीसाठीच त्यांनी रालोआसाठी मतदान केले आहे, असे त्यांनी यात नमूद केले.
निवडणुकीचे कल पाहून आज सकाळीच मी पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांचे अभिनंदन केले. नवभारताच्या उभारणीची जी प्रकि‘या मोदी यांनी सुरू केली होती, ती आता खर्या अर्थाने पूर्ण होणार आहे, असा विश्वास राजनाथसिंह यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेत्याचं मतमोजणी केंद्रावरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन
भोपाळ ;- लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपने २०१४ पेक्षाही मोठ्या फरकाने विरोधकांना पाणी पाजल्याचे कल हाती येऊ लागले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते रतन सिंग यांचा मतमोजणीच्या वेळीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
रतन सिंग हे मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष होते. मतमोजणीच्या वेळी निवडणुकांचे काय कल आहेत? याबाबत माहिती घेत असताना रतन सिंग यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी याबाबत तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनाही सांगितले. पण तेवढ्यातच ते कोसळले.
साक्षी महाराज उन्नावमधून तब्बल चार लाख मतांनी विजयी
उन्नाव ;- वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजपाचे उमेदवार साक्षी महाराज उन्नावमधून तब्बल चार लाख मतांनी विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत वाढतच गेली. ५७ टक्के मते मिळवून साक्षी महाराजांनी आपलाच विक्रम मोडला.
२०१४ लोकसभा निवडणुकीत साक्षी महाराज ४३.०९ टक्के मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेसच्या उमेदवार अनू टंडन यांच्याकडून साक्षी महाराजांना कडवी टक्कर मिळेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात प्रतिस्पर्धी उमेदवार साक्षी महाराजांच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत.
साक्षी महाराज वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आपल्या वक्तव्यावरुन अनेकदा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणले होते.
निवडणुक निकालावर रा.स्व.संघाची पहिलीच प्रतिक्रिया
नवी दिल्ली ;- देशभरात आज चालू असलेल्या लोकसभा निवडणूक निकालावर संघातर्फे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भैयाजी म्हणाले, ” देशाला पुन्हा एकदा स्थिर सरकार मिळत आहे, हे देशाचे भाग्य आहे. हा राष्ट्रीय शक्तीचा विजय आहे. या विजय यात्रेत ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. लोकशाहीचा आदर्श जगासमोर पुन्हा एकदा प्रस्तुत झाला आहे. आम्ही विश्वास व्यक्त करतो की नवीन सरकार देशातील जनतेच्या भावना व इच्छा पूर्ण करण्यास यशस्वी ठरेल. निवडणुका संपन्न होत असताना आपसातील कटुता नष्ट व्हाव्यात व जन भावनांचा नम्रपणे स्वीकार व्हावा” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी ट्विटर वर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंच्या सभा फक्त करमणूक ठरल्या !
मुंबई : लोकसभा मतदानाच्या आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन मोठ्या प्रमाणात भाजपचा अपप्रचार केला. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपच्या कामाची तथाकथित पोलखोलही केली. त्यांनी घेतलेल्या सभांना मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला असे चित्र जरी आधी दिसत असले तरी त्यांच्या सभा निव्वळ करमणूक कार्यक्रम ठरल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या भाजपप्रणित एनडीएला ३३७ जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला ९० जागांवर आघाडी मिळाली आहे. ११५ जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांचा विचार केला तर भाजप २४, शिवसेना २०, राष्ट्रवादी ३ आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा काग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड आणि सातारावगळता इतर सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा कांग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेठीची लढत कायम राहणार स्मृतीत
अमेठी ;- उत्तर प्रदेश मध्ये सगळेच दिग्गज राजकारणी आखाड्यात उतरले असताना लोकसभेत कोणाची बाजी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर आज निकालाचा दिवस असल्यामुळे मतमोजणीवरून हळूहळू कोणाचे पारडे जड याचा अंदाज लागण्यास सुरुवात झाली. शेवटी या सगळ्या चुरशीच्या लढतीनंतर जय आणि पराजय हे आलेच.
उत्तर प्रदेशमधील आपल्या होमग्राउंड अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष अर्थातच राहुल गांधी यांनी उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांची लढत इतकी सोपी नव्हती याचे कारण म्हणजे स्मृती इराणी यांचे आव्हान. स्मृती इराणी यांचे आव्हान म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते आणि तसेच झाले.
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून स्मृती इराणी आघाडीवर होत्या. मात्र फारच कमी फरक असल्यामुळे कोणाच्या बाजूने पारडे झुकेल याचा अंदाज लावणे कठीण होते. मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आल्यावर मात्र चित्र स्पष्ट झाले आणि स्मृती इराणी या १९ हजार ६९७ मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सगळ्यात स्मृती इराणी यांनी सर्वांच्या खरोखरीच स्मृतीत राहील अशी झुंज दिली असेच म्हणावे लागेल.