मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळ आल्यावर हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे मोठं विधान केलंय. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेकजण संपर्कात आहेत.
गेल्या पाच वर्षात अनेकजण आमच्याकडे आले. संपर्काच्या नात्यामध्ये परिवर्तन निवडणुकीवेळी होतं. आमच्या संपर्कात अजुनही अनेक आमदार आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नाही. काही मतदारसंघ असे आहेत तिथे आम्ही अजुनही पोहोचलेलो नाही. त्यामुळे तिथेही पोहोचायला मिळाले तर चांगलंच आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “राजकीय संबंध वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे. आम्हाला रोज एकमेकांना सामोरं जावं लागतं. मात्र, महाराष्ट्राची परिस्थिती दक्षिणेतील राज्यासारखी नाही. आम्ही धर्मांध शत्रुत्व बाळगत नाही. एकमेकांच्या विरोधात कितीही बोललो तरी आपलं नातं चांगलं होऊ शकतं. बाकी अर्धसत्य सांगायची वेळ येईल असं वाटतं. ती वेळ आल्यावर नक्की सांगेन.”, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.