नाशिक – राज्यातील शाळा-महाविद्यालयांचा परिसर शासनाने तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यासंदर्भात
कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बालदिन ते जागतिक कर्करोग दिना दरम्यान दि. १४ नोव्हेंबर ते दि. ४ फेब्रुवारी २०२० दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी मानसिकता निर्माण करण्याकरिता सलाम मुंबई फाउंडेशन, राज्य शासनाचा शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या समन्वयातून तंबाखूमुक्त शाळा उपक्रम यशस्वी करण्याचे नियोजन आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वर्धा, धुळे या जिल्ह्यांमधील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. याशिवाय या विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील अभियानात सहभागी होऊन तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर गेले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर कार्यरत राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांची व्यापक प्रमाणात मदत घेतली जाणार आहे. या विद्यार्थ्यांनी तंबाखुमुक्त न झालेल्या आणि आपल्या महाविद्यालय किंवा घराजवळची एक शाळा दत्तक घेऊन तेथे आठवड्यातून दोन तास असे चार आठवडे स्वतः उपस्थित राहून तंबाखूमुक्त शाळेचे निकष पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे.
याशिवाय सलाम मुबई या संस्थेच्या टोबॅको फ्री स्कुल या मोबाईल ऍपवर निर्दिष्ट माहिती देखील संकलित करायची आहे. या अभियानात सहभागासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पत्रक काढले असून पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या रासेयो विभागप्रमुखानीं आपापल्या भागातील तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तंबाखूतील हानिकारक तत्वे, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, तंबाखू कशी सोडवायची, तंबाखू व अंमली पदार्थ नियंत्रण कायदा या बद्दलचे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण रासेयो विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. टोबॅको फ्री स्कुल या ऍपवर शाळेची नोंदणी करून ११ प्रकारच्या निकषांच्या पूर्ततेसाठी चार आठवड्यांचा कार्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांना प्रबोधनाच्या माध्यमातून या अभियानात सामावून घेण्यात येणार आहे.