जळगाव – राष्ट्रीय महामार्गावर मागील 10 दिवसात चार ठिकाणी अपघात झाले. यात तीन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यातील काही अपघातात महामार्गावरील खड्डेच जास्त कारणीभूत आहेत.
महामार्गावरील अपघाताच्या मालिकेमुळे त्या मार्गावर नेहमी ये-जा करणारे वाहनचालक व प्रवाशी आणि अन्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मॉर्निंग वॉकनंतर घराकडे परतत असलेल्या रज्जाक मोहम्मद पठाण (वय 74, रा.ओमशांतीनगर, खोटेनगर) या वृद्धाला सोमवारी सकाळी खोटेनगरजवळील महामार्गावर बसने धडक दिली. अपघातनंतर जखमी पठाण यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.
बांभोरीकडील जैन पाइप कंपनीच्या गेटजवळ मागून येणार्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार रवींद्रसिंग फत्तेसिंग वतपाळ (वय 55, रा.रेल्वे लाइननजीक, हनुमान मंदिर परिसर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. यानंतर ट्रकचालकाविरुद्ध पाळधी दूरक्षेत्रात सोमवारी गुन्हा दाखल झाला. एरंडोल-पारोळा दरम्यान सारवे फाट्याजवळील महामार्गावर दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मोटारसायकलवरील दाम्पत्यास भरधाव ट्रकने चिरडले होते. त्यात मधुकर महारु पाटील (वय 45), व त्यांच्या पत्नी प्रतिभा मधुकर पाटील (वय 40) हे दाम्पत्य जागीच ठार झाले होते. खाटेनगरातील बसच्या धडकेच्या ठिकाणी समांतर रस्ताअसता तर कदाचित हा अपघात टळला असता. या समांतर रस्त्याअअभावी आणखी किती बळी जाणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांमधून उपस्थित होत आहे.