पुणे : राज्यभरातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त वारकरी ज्या वेळेची वाट पाहत असतात ती वेळ आता जवळ येत आहे. आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तारीख समोर आली होेती. त्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊलींच्याही पालखी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आषाढीवारी सोहळा 11 जुनला आळंदीतुन पालखी प्रस्थान ठेवणार असुन 29 जुनला पंढरीत दाखल होणार आहे. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यानुसार 10 जूनला तीर्थक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावर्षी 29 जूनला देवशयनी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे.
मात्र यंदाच्या आषाढीवारी सोहळा उत्साहात साजरा होत असताना कोरोनाचे सावटही उभे राहिले आहे. देशभरातुन वारकरी मजल दर मजल करत माऊलींच्या या पायी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येत असतात. शेतीच्या मशागतीची कामे अटपुन कष्टकरी बळीराजा माऊलींच्या सोबतीने पंढरीकडे प्रस्थान ठेवणा-या सोहळ्यात सहभागी होत असतो. हा वारकरी लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थित माऊलींचा पालखी सोहळा आळंदीत रंगणार आहे. यासाठी आळंदी देवस्थान आणि पालखी प्रमुखांच्या उपस्थित पहिली बैठक पार पडली. यावेळी पालखी प्रस्थान ते पंढरीपर्यतच्या मुक्कामाचे नियोजन आणि अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.
दरम्यान, वारी सोहळ्यातील पालखीच्या मुक्कामांची, विसाव्याची माहिती देहू देवस्थानकडून जाहीर करण्यात आली आहे. यंदाचे वर्ष हे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे 338वे आहे. 10 जूनला प्रस्थान झाल्यानंतर दरमजल करत सोहळा 28 जूनला पंढरपूरात पोहोचणार आहे. एकूण 19 दिवसांचा हा प्रवास असेल. पालखी 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे अशी माहिती, पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी दिली आहे.