पाचोरा-(किशोर रायसाकडा) – तालुक्यातील वाळू व्यावसाया वरून एकाची हत्या नुकतीच झालेली असताना अवैध वाळू वाहतूक थांबेनासी दिसत आहे.दि.५ एप्रिल रोजी अवैधरित्या अवैध वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर गस्तीवर असलेल्या महसुल विभागाच्या पथकाने पकडुन तहसिल कार्यालयात आणत असतांना पथकातील अधिकारी यांना धक्काबुक्की करुन चौघांनी घटनास्थळावरून ट्रॅक्टर पळवुन नेल्याची घटना घडल्याने चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात होत असलेली अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, काल ५ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता मंडळ अधिकारी प्रशांत अर्जुन पगार, दिपक शिवाजी दवंगे हे गाळण, लोहटार मार्गे अंतुर्ली फाट्यावरून जात असतांना पथकास एक लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर त्यास लाल रंगाची ट्रॉली असलेले दिसले असता पथकाने ट्रॅक्टर थांबवुन चौकशी केली असता ट्रॉलीमध्ये वाळु आढळुन आली. यामुळे चालकास विचारपुस केल्यानंतर चालकाने त्याचे नाव अजय सुरवाडे असे सांगितले.
त्यानंतर पथकाने ट्रॅक्टरचे व ट्रॅक्टरच्या चेसिस नंबरचे फोटो काढुन सदरचे ट्रॅक्टर पथकातील एकास चालकासोबत बसुन प्रशांत पगार हे मध्यरात्रीच्या १२:३० वाजेच्या सुमारास मागावुन मोटरसायकलने येत असतांनाच भडगाव रोडवरील शिंदे इंटरनॅशनल स्कूलजवळ एका मोटरसायकलवर शुभम परदेशी, पंकज राजपुत, धाक्कु आप्पा (पुर्ण नाव माहित नाही) हे येवुन त्यांनी ट्रॅक्टर थांबवुन पथकाशी हुज्जत घालत तसेच धक्काबुक्की करुन घटना स्थळावरुन ट्रॅक्टर पळवुन नेले.
या प्रकरणी आज रोजी सुनिल रामसिंग राजपुत यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने अजय सुरवाडे, शुभम परदेशी रा. पुनगाव, ता. पाचोरा, पंकज राजपुत, धाक्कु आप्पा (पुर्ण नाव माहित नाही) रा. अंतुर्ली ता. पाचोरा या चौघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे.