जळगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी ‘जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी ‘रिवूलिस पीटीई लि.’ (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या मुळे जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसाय, रिवूलिस या सिंचन व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये समाविष्ट झाला आहे. जागतिक सिंचन आणि पर्यावरण क्षेत्रात या एकत्रीत कंपनीची उलाढाल ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (अंदाजे रु. ६,१५० कोटी) इतकी असेल. यामुळे ही कंपनी जगातील उलाढालीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. २१ जून २०२२ मध्ये ‘जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ आणि रिवूलिस यांच्यात करार झाला होता. परंतु या कराराच्या अटीशर्ती व परवानगी पूर्ततेसाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला. २९ मार्च २०२३ रोजी या संपूर्ण व्यवहाराची पूर्तता झाल्याची माहिती जैन इरिगेशनने दिली आहे.
जैन इरिगेशनकडे एकत्रित कंपनीच्या भांडवलातील १८.७ टक्के एवढे समभाग असतील. एकत्रीकरण केलेल्या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये दोन संचालक प्रतिनिधी आणि एक निरीक्षक असेल आणि त्यामुळे जैन इरिगेशनच्या सिंचनातील कौशल्यामुळे एकत्रीकरण केलेल्या कंपनीच्या व्यवसायात वाढ व्हायला मदत होईल. या दोन्ही कंपन्या आता “Rivulis – In alliance with Jain International” म्हणून ओळखल्या जातील.
वरील व्यवहार पूर्ण झाल्यामुळे खालील गोष्टी साध्य होतील –
-
जैन इरिगेशनचे ३१ डिसेंबर २०२२ रोजी एकत्रित निव्वळ कर्ज अंदाजे ६,४१५ कोटी होते. या व्यवहारामूळे २८०० कोटी रुपयाचे (४४ टक्क्यांनी) कर्ज कमी झाल्या मुळे आता जैन इरिगेशनचे कर्ज ३,६१५ कोटी रूपयांपर्यंत खाली आले आहे.
-
जैन इरिगेशनने ३०० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे २४६० कोटी रु.) ची कॉर्पोरेट गॅरंटी दिलेली होती ती या व्यवहारानंतर मुक्त झाली आहे.
-
जैन इरिगेशनचा नवीन कंपनीशी कराराप्रमाणे सिंचन क्षेत्रात भारतातून दीर्घकालीन पुरवठा करार अस्तित्वात येईल. या करारामुळे रिवूलीसच्या उत्पन्नात आणि नफ्यात वाढ होईल.
-
या एकत्रीकरणामुळे रिवूलिस ही कंपनी त्यांच्या असलेल्या बाजारपेठांमध्ये जैन कंपनींच्या ब्रॅंडेड उत्पादनांचा प्रचार व प्रसार करेल.
-
जैन इरिगेशन ही सिंचन क्षेत्रातील मोठ्या नेतृत्व असलेली कंपनी म्हणून नावारुपास येईल. त्यामुळे भविष्यातील व्यवसायात कंपनीला चांगली संधी राहील. तसेच कंपनीच्या भारतातील सिंचन व इतर व्यवसायास खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल व त्या जोडीला जगातील सिंचन व्यवसायात व्यापक वाढ होईल. यामुळे जैन इरिगेशनच्या एकल ताळेबंदातील कर्जात घट होईल.
सूक्ष्मसिंचन क्षेत्रात वैश्विक पातळीचे नेतृत्व करणारी कंपनी – अनिल जैन
“आमच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे रिवूलीसमध्ये एकत्रीकरण झाले आहे. त्यामुळे हा जैन इरिगेशनसाठी महत्वाचा टप्पा ठरला आहे, हे जाहीर करताना आनंद होतो आहे. रीवूलीसबरोबर या धोरणात्मक एकत्रीकरणामुळे तसेच टेमासेक बरोबर भागीदारी केल्याने सूक्ष्म सिंचनात जागतिक दर्जाचे नेतृत्व करणारी कंपनी बनली आहे. नवीन कंपनीला खूप चांगल्या दर्जाच्या जैनच्या आधुनिक सिंचन व्यवसायातील उत्पादनांना जास्त उत्पन्न आणि नफा मिळेल. या विस्तारीकरणामुळे शेतकरी डिजीटल शेती आणि नाविन्य व शाश्वत व्यवसाय करतील. पूर्वी पेक्षा आता अन्न सुरक्षा आणि जागतिक पर्यावरणातील होणाऱ्या बदल इत्यादी समस्यांवर शाश्वत उपाय करू शकू असा विश्वास आहे. रिवूलीस व टेमासेक बरोबर एकत्र काम करू आणि कृषी व अन्न परिसंस्था यामध्ये सकारात्मक परिणाम करू. इएसजी, हायटेक कृषी घटक (इनपूट) आणि तंत्रज्ञानातील नावीन्य यातील सहकार्यात संधी मिळवू. आम्ही पाण्याची कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादनात वाढ साध्य करू तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही कार्य करत राहू.”
· अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड जळगाव.