मुंबई ( प्रतिनिधी)- राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने व्यापक काम करणार असल्याचा निर्णय मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या संयुक्त भेटीत मुंबई येथे झाला.
महाराष्ट्र मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद डोईफोडे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा श्रीहरी देशमाने, विजय सांगळे यांची उपस्थिती होती. वार्ताहर संघाच्या मंत्रालयातील कार्यालयात प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांच्यात वार्तालाप झाला. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संपूर्ण महाराष्ट्रात मोठे संघटन आहे, अनेक संघटनांचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकजूट करण्याची गरज असल्याचे प्रमोद डोईफोडे यांनी सांगितले.
मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघाची महत्वपूर्ण भूमिका : मुंडे
राज्यातील पत्रकारांचे, प्रामुख्याने ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे, यावर मुंडे आणि डोईफोडे यांच्यात एकमत झाले. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ हा सरकार आणि प्रशासकीय पातळीवर महत्वपूर्ण संघ आहे. ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी धसास लावण्यासाठी
संयुक्तपणे प्रयत्न करू, प्रसंगी व्यापक लढा उभा, असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले.