मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे सदावर्ते यांना दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही.
महाविकास आघाडीचे सरकार असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती. काही महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपातील कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडली होती.
एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असल्याचे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर अनेकदा सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता. वकील गुणरत्न सदावर्ते हे न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला येत होते. त्याच दरम्यान ते आपला न्यायालयीन गणवेश अनेकदा परिधान करून येत होते.
गुणरत्न सदावर्ते यांचे आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिल कडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.