अमळनेर : सध्या नकली नोटा छापून चलनात आणल्या जात असल्याचे प्रमाण वाढतच आहे. अशातच आता अमळनेरात नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या दोघांच्या खिशात १० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या.
पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना गोपनिय माहिती मिळाली, की पैलाड भागात दोन जण नकली नोटा चलनात आणत आहेत. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस कर्मचारी किशोर पाटील, दीपक माळी, शरद पाटील, रवींद्र पाटील, सिद्धांत शिसोदे, नीलेश मोरे यांच्या पथकाला ताबडतोब पैलाड भागात रवाना करून छापा टाकण्यास सांगितले असता त्यांनी भोला टेलर यांच्या दुकानाजवळ दोन्ही व्यक्ती संशयास्पद आढळून आले.
त्यांच्या दोघांच्या खिशात १० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांचे नाव कैलास शिवराम भोया (वय २८, रा. इहदरी, ता. कफराड, जि. बलसाड) व दुसरा वसंत कालसिंग मुलकाशा (वय २३, रा. कावडझिरी, ता. धारणी. जि. अमरावती) त्यांच्याजवळ दुचाकी (एमएच २७, डीसी ७०५३) व दोन मोबाईल आढळून आले.
त्यांच्याजवळील दहा हजार रुपयांच्या नकली नोटा व दुचाकीसह मोबाईल असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पुढील तपास करीत आहेत.