जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील बी.जे मार्केट व सिव्हिल हॉस्पिटल जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हटविण्यात आल्याचे समजताच शहरातील भीमसैनिकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर यातून मार्ग काढत पोलीस बंदोबस्त असतांनाच पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात आला.
बौद्ध समाज बांधवानी प्रचंड विरोध केल्यानंतर लागलीच समाज बांधवानीच स्मारक बसविण्याचे काम केले त्यानंतर समाजाच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असता योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल, कायदेशीरबाबी तपासण्यात येउन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले. दरम्यान पोलीस प्रशासनाने यावेळी आंबेडकरी नेत्यांचे व समाजाचे म्हणणे एकूण घेत कायदेशीर कार्यवाहीचे आश्वासन दिले.
सदर प्रकरणी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक गेल्या चाळीसवर्षांपासून असल्याचा उल्लेख करीत स्मारक हटविण्याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. तरि समाजबांधवानी अफवावर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन करण्यात येतं आहे.