कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर परिसरात एका १९ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. दरम्यान, मुलीने आत्महत्येपूर्वी २ सुसाईड नोट लिहिलेल्या आढळून आल्या आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणामुळे नातेवाईकांना जोरदार धक्का बसला.
कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर परिसरात राहणारी नकुशा साऊ बोडेकर हिचे १० वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती बोंद्रे नगर परिसरातच घरकाम करून कुटुंबाला मदत करत होती. ४ दिवसांपूर्वीच ती बोंद्रे नगर येथीलच नातेवाईकाच्या घरी आली होती. बुधवारी घरी कोणीही नसताना तिने छताच्या लोखंडी अँगलला ओढणी बांधत गळफास घेतला. काही वेळाने नातेवाईक घरी आल्यानंतर पाहिले असता त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने कडी तोडून दरवाजा उघडला पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
तिनं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून आपल्या आत्महत्येला त्यांच्याच नात्यातील मारूती हरी बोडेकर जबाबदार असल्याचं नमुद केलं आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने म्हटलं आहे. तर त्रास देणाऱ्या तरुणाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नकुशाच्या नातेवाईकांनी घेतली होती.
दरम्यान याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू केला. यावेळी पोलिसांना नकुशाच्या हातात २ सुसाईड नोट आढळल्या. त्या निळ्या आणि लाल शाईच्या पेनाने लिहिलेल्या चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यामध्ये मारूती हरी बोडेकर या तरुणाने त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख युवतीने केला होता. तसेच त्रास देणाऱ्याचे नाव लिहून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणत ‘माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल’ असं तिने चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.