जळगाव, (प्रतिनिधी)- आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे १७ व्या राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्काराचे दिनांक १२ मार्च रविवार रोजी शहरातील व. वा. वाचनालयातील सभागृहात वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव, हरीशचंद्र सोनवणे, दीपक जोशी, विलास यशवंते आदी विचारमंचावर उपस्थित होते.
भीम शाहीर सीमा पाटील मुंबई यांना राजेंद्र विश्वासराव भालेराव स्मृती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तर दंगलकार नितीन चंदानशिवे सांगली यांना व्यंकट सेनू भालेराव स्मृती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले पुरस्कार आणि जळगावातील जेष्ठ विधीतज्ञ राजेश झाल्टे यांना विमलताई वसंतराव सुरडकर स्मृती छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.संजय आवटे यांनी अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त केले.तसेच विविध क्षेत्रात कार्य केलेल्या हर्षल पाटील, मुकेश कुरील, संतोष मनुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचलन योगिता पाटील तर आभार निर्मल यशवंते यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सदस्य हरीशचंद्र सोनवणे, दीपक जोशी, विलास यशवंते, प्रबुद्ध भालेराव, कुलदीप भालेराव यांनी परिश्रम घेतले.