पारोळा,(प्रतिनिधी)- तालुक्यातील मोंढाळा शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास अडकला आणि परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.हिवरखेडा शिवारात लागोपाठ दोन दिवस वासरांचा फडशा पाडत असलेल्या बिबट्याच्या शोधात वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी परिसरात ठाण मांडून होते. ट्रॅप कॅमेरा व रात्रीच्या गस्त सुरू होता.
हिवरखेडा परिसरात ८ रोजी रात्री पुन्हा वासराचा फडशा पाडण्यात आला. वनखात्याचे अधिकारी विवेक होसिंग, उपवनसंरक्षक जळगाव व सहायक वनसंरक्षक एस. के. शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा वनक्षेत्रपाल शामकांत बी. देसले, वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वनपाल अनिल बोरूदे, वनरक्षक सविता पाटील, वनरक्षक रोहिणी सूर्यवंशी, आय. बी. मोरे, एस. यु. खैरनार व संरक्षण मजूर यांच्या सहकार्याने या भागात पिंजरा लावण्यात आला. याच पिंजऱ्यात अखेर बिबट्या अडकला.