मुंबई : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे आता पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी काल शनिवारी जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पिकं धोक्यात येण्याची शक्याता आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल शनिवारी जळगावसह बुलढाण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरण थंड झाले होते. मात्र याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात सर्वत्र रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये अनेकांनी पिकांवर औषध फवारणीला सुरूवात केली आहे. ५ ते ७ मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
कुठे होणार गारपीट
पश्चिम चक्रवाताचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहू लागलेत.त्यामुळे गारपीट तसेच पावसाच्या सरी कोसळणार असं हवामान विभाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, विदर्भ तसेच पालघर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. ७ मार्च रोजी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळेल तर ८ मार्च रोजी गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवारी नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा तसेच चंद्रपूर येथे हलक्या सरी कोसळतील. ६ मार्चपर्यंत येथे ढगाळ वातावरण कायम राहणार असून तुरळक पाऊस पडणार आहे. शेतात सध्या द्राक्ष काढणीला आलेत. मात्र पाऊस आल्यामुळे द्राक्षांवर किड पडण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी ८ मार्चपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. आज रविवार असल्याने मुंबईकर फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे असे हवामान खात्याने सांगितले आहे.