अमळनेर,(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधांच्या आड येत होता मुलगा म्हणून थेट जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना घडली होती, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आईचे तिच्या भाच्याशी असलेले अनैतिक संबंध मुलाने पाहिले. त्यामुळे तुकडे तुकडे करून मुलाचाच खून करण्यात आला होता. याप्रकरणी अमळनेर जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी शुक्रवारी निकाल दिला असून दोषी महिला व तिच्या भाच्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गीताबाई दगडू पाटील (३५) व तिचा भाचा समाधान विलास पाटील (२५, दोघे रा. चहार्डी, ता. चोपडा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची, तर मंगेश दगडू पाटील (१३ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना २ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली होती.गीताबाई व समाधान यांचे अनैतिक संबंध होते. मंगेशने ही बाब वडिलांना सांगेल असे सांगितले. दि. २ रोजी गीताबाईने त्याच्या डोक्यात काठीने तीन- चार वार केले.
तो बेशुद्ध झाला. समाधानने त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला गोणीत घातले. रात्री गीताबाई समाधानच्या घरी आली. तेथे दोघांनी त्याच्या शरीराचे कुऱ्हाड , चाकू व विळ्याने तुकडे तुकडे केले व गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी २६ रोजी गीताबाई व समाधान या दोघांना अटक केली होती.
सरकारी वकील किशोर बागुल यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यात न्यायालयाने डीएनए अहवाल, डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. नीलेश देवराज, कुलदीप पाटील, तपास अधिकारी योगेश तांदळे, श्वान पथकाचे विनोद चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून गीताबाई व समाधान यांना जन्मठेपेची शिक्षा तसेच पुरावा नष्ट केला म्हणून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अटक झाल्यापासून आरोपी जिल्हा कारागृहातच होते.