मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार असताना मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो, हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन,’ असाही खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं.आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, अशी टीका विरोधकांनी शिंदे सरकारवर केली होती. यासंदर्भात बोलताना, मुख्यमंत्री म्हणाले, “मला त्यांना सांगायचा आहे की, दाऊदची बहिण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला. त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरं झालं अजित पवारांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. कारण महाराष्ट्र द्रोह मोठा की देशद्रोह मोठा? सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे अजित पवार वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी मानसिकता आम्ही समजू शकतो. मासा पाण्याविना तडफडतो, तशी सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर विरोधकांची अवस्था झाली आहे.”