मुंबई : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. कारण,राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ही सुनावणी काल पूर्ण झाली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालय आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या आजच्या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा फैसला होणार आहे.
आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. आज, शुक्रवारी १०:३० वाजेच्या सुमारास निकाल जाहीर केला जाईल
मागील तीन दिवसांत काय घडलं?
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यांच्या घटनापीठासमोर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. नबाम रेबिया निकालाचा फेरविचार करण्याची गरज नसून हा फक्त काथ्याकूट ठरेल, असा युक्तिवाद पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी केला.
दुसरीकडे याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी प्रतिवाद केला. ‘शिंदे गटाने २१ जून रोजी विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात दिलेली अविश्वास नोटीस हा खोडसाळपणा आहे. नोटीस देण्यासाठी ठोस कारणही देण्यात आले नाही. उपाध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवतील असे केवळ गृहीत धरून ही नोटीस बजावली होती, असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं.