मागील काही काळात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसांना फरफटत नेलं असल्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. अशीच एक धक्कादायक घटना आता वसईमधून समोर आलीय. एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला तब्बल दीड किलोमीटर फरफटत नेलं. या घटनेचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
या घटनेत सुदैवाने वाहतूक पोलिसाला कुठलीही दुखापत झालेलीनसून याबाबत कारचालकाविरोधात माणिकपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सावेश सिद्धिकी (वय १९ वर्ष) असे अटक केलेल्या या कारचालकाचे नाव आहे.
वसईच्या वसंत नगरी सिग्नल जवळ ही खळबळजनक घटना घडली. वाहतूक पोलिस (Police) हवालदार सोमनाथ चौधरी हे रविवारी सायंकाळी वसईच्या वसंत नगरी सिग्नल जवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी सर्कलवर रेड सिग्नल असताना एक कार चालक रेड सिग्नल तोडून पुढे आला.
कारचालकाने वाहतूक पोलिसाला दीड किलोमीटर फरफटत नेलं, वसईमधील खळबळजनक घटना#Police #ViralVideo #Vasai #VasaiNews #MumbaiPolice pic.twitter.com/J1L9yBd8IM
— Satish Daud Patil (@Satish_Daud) February 14, 2023
यावेळी सोमनाथ चौधरी यांनी कारचालकाला हाताने कार बाजूला घेण्यासाठी इशारा केला. मात्र, कार चालकाने कार पुढे नेत चौधरी यांच्या अंगावरच गाडी घातली. चौधरी यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीच्या बोनेटवर चढले आणि गाडीच्या काचेच्या मधल्या जागेत पकडले. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी चालकाला कार थांबवण्यास सांगितलं. मात्र, चालकाने कार न थांबवता तशीच पुढे गोखिवराच्या दिशेने नेली. या घटनेनंतर चालक सावेश सिध्दीकी आणि त्याच्या सोबतचा मित्र प्रितम चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.