अदानी समूहाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच आता हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सिमेंट वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आणि कर विभागाने बुधवारी अदानी समूहाच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापे टाकले. आयकर विभागाने अदानी विल्मार ग्रुपच्या दुकानांवर ही कारवाई केली आहे.
दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षिण अंमलबजावणी विभागाचे पथक अदानीच्या स्टोअरमध्ये पोहोचले जेथे अदानी समूहाच्या रेकॉर्डची छाननी करण्यात आली.
हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाचे शेअर्स कोसळले. मात्र, बुधवारी काही प्रमाणात रिकव्हरी पहायला मिळाली. स्टॉक खाली आल्यानंतर गौतम अदानी जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. अदानी मुद्द्यावरून विरोधक सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हिमाचलमधील अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर आता छापेमारी सुरु झाली आहे.
अदानी समूहाच्या एकूण सात कंपन्या हिमाचल प्रदेशात कार्यरत आहेत. या कंपन्या राज्यात फळे साठवण्यासाठी शीतगृह साखळी सुविधा उपलब्ध करून देतात. याशिवाय किराणा मालाच्या पुरवठ्यातही त्याचा मोठा वाटा आहे. राज्यातील नागरी पुरवठा आणि पोलीस विभागातील वस्तूंचा पुरवठा अदानी ग्रुपच्या माध्यमातून केला जातो.
दरम्यान, आज गुरूवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 11.19 टक्क्यांनी घसरले असून 1,922 रुपयांवर बंद झाले.