नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. ही इच्छा त्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.
जारी केलेल्या निवेदनात भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे की, मला महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही अतिशय सन्मानाची बाब आहे. त्या महाराष्ट्राची जी संत आणि समाजसेवकांची भूमी आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील जनतेकडून मला मिळालेले प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. या इच्छांबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो असल्याची माहितीही कोश्यारी यांनी दिली. पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की, त्यांना राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे.