बलरामपूर : छत्तीसगडमधील बलरामपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहून संतापलेल्या बापाने मित्रांच्या मदतीने मुलीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला. कुलदीप खैरवार असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तरुणीने पोलीस ठाणे गाठत प्रियकरासोबत घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती दिली. यानंतर या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला. याप्रकरणी वाड्रफनगर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
लोधी गावातील रहिवासी असलेला कुलदीप खैरवार हा दुसऱ्या राज्यात मोलमजुरीचे काम करायचा. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी तो कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी घरी परतला होता. कुलदीपचे शेजारच्या गावातील तरुणीशी प्रेमसंबंध सुरु होते. संक्रांतीच्या रात्री तो मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर प्रेयसीच्या घरी तिला भेटायला गेला. यावेळी प्रेयसीच्या घरी तिचे आई-वडिल नव्हते. तरुणीच्या दोघा नातेवाईकांना तिच्या घरी कुणीतरी तरुण आल्याचे कळले. त्यांनी घरात घुसून पाहिले असता तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. यानंतर त्या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण करत त्याला घराबाहेर काढले.
हे पण वाचा..
राशिभविष्य – २२ जानेवारी ; ‘या’ राशींच्या लोकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी
सावधान ! अंड्यांसोबत या गोष्टी खाऊ नका, नाहीतर…
यानंतर बाहेर आणखी तिघांनी त्याला मारहाण केली आणि मुलीच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली. तरुणीच्या बापाने घराकडे धाव घेत कुऱ्हाडीने वार करुन तरुणाची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सर्व आरोपींनी तरुणाचा मृतदेह त्याच्याच गावातील एका विहिरीत फेकला. तरुण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी न पोहचल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र तरुणाचा तिसऱ्या दिवशीही कुठे थांगपत्ता लागला नाही. यादरम्यान, तरुणीने स्वतः वाड्रफनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली.
हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक
पोलिसांनी तात्काळ गावात दाखल होत विहिरीतून तरुणाचाा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी तरुणीच्या बापासह सहा आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.