मुंबई : बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोरोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे SBI च्या अनेक ग्राहकांच्या मोबाइलवर 147.50 रुपये कपाल्याचा मेसेज आला आहे. परंतु हे चार्ज लावण्यामागचं कारण समोर आलं आहे.
तुमच्या खात्यातून कोणत्याही व्यवहाराशिवाय म्हणजेच ऑटो डेबिटशिवाय 147.50 रुपये कापले गेले असतील तर काळजी करण्याचे कारण नाही. खरं तर, बँक आपल्या ग्राहकांकडून वापरल्या जाणाऱ्या एटीएम आणि डेबिट कार्डच्या वार्षिक सेवांवर शुल्क आकारते. एसबीआयने एटीएम आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यातून 147 रुपये कापले आहेत.
एसबीआय आपल्या ग्राहकांकडून एटीएम आणि डेबिट कार्डच्या वार्षिक देखभालीसाठी 125 रुपये चार्ज करते. तसेच ग्राहकांना 18 टक्के जीएसटी त्यावर लागतो. 18 टक्के जीएसटीच्या दराने 125 रुपये मोजले तर ही रक्कम 147.50 रुपये होते. त्याचप्रमाणे एसबीआय एटीएम किंवा डेबिट कार्ड बदलण्यासाठी 300 रुपये आणि 18 टक्के GST आकारला जातो.
क्रेडिट कार्डच्या फीमध्ये देखील बदल
एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने विविध क्रेडिट कार्डशी संबंधित व्यवहारांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल केला आहे. एसबीआय कार्डने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2022 पासून भाडे भरण्याच्या व्यवहारावर 99 रुपये प्रक्रिया शुल्क + लागू केलं आहे.