मुबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. अचानक छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी आज पहाटे 6.30 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अजूनही आयकर विभाग आणि ईडीची तपासणी सुरू आहे. घरातील कुणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बाहेरच्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.