अमरावती : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांच्या वाहनांना अपघात झाल्याचे समोर आले आहे. आता अशातच प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात बच्चू कडू थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हा अपघात आज सकाळी 6 ते साडेसहाच्या दरम्यान घडली. आमदार बच्चू कडू हे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एक भरधाव दुचाकी आली आणि तिने कडूंना धडक दिली. याा धडकेत बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.