प्रेम हे आंधळं असते. ते कधी कुठेही, कुणावारही होऊ शकते. राँग नंबरनं सुरू झालेल्या अजब प्रेमाची गजब कहाणी आता समोर आलीय. प्रेमात एक विवाहिता आपला पती आणि दोन चिमुकली मुलं सोडून ती बॉयफ्रेंडसोबत रफुचक्कर झाली. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील खनवा गावातील ही प्रकार आहे.
खनवा येथील मदनचं लग्न ९ वर्षांपूर्वी छतरपूरच्या सुनीताशी झालं होतं. जुलै २०२२ मध्ये सुनीताच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. हळूहळू हा राँग नंबर फेव्हरीट लिस्टमध्ये गेला. त्यांच्यात इतक्या गप्पा रंगल्या की सुनीता आणि राँग नंबरवाला यांची तहानभूकच हरवली. दोघेही तासनतास गप्पा मारू लागले. दोघांनी फोनवरच प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. राँग नंबरने सुरू झालेला हा प्रेमाचा गुलकंद इतका मुरला की १४०० किलोमीटरचं अंतरही त्यांच्या प्रेमाला रोखू शकलं नाही.
३ महिन्यांनंतर बॉयफ्रेंडला भेटली
राँग नंबरवरून ज्या तरुणाशी सुनीता तासनतास फोनवर बोलत होती, त्या तरुणाचं नाव उदमनाथ आहे. राजस्थानच्या रंगमहल परिसरात राहतो. तीन महिने फोनवर गप्पा रंगल्यानंतर २२ ऑक्टोबरला सुनीता तिच्या या प्रियकराला भेटायला गेली. ती घरातून पसार झाली.
पत्नी अचानक बेपत्ता झाली. तिच्या पतीला धक्काच बसला. त्यानं पलामू जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुनीताचा तपास सुरू केला.
दोघांनी लग्नही केलं
तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती सुनीताच्या फोनचे कॉल डिटेल्स हाती लागले. त्याआधारे पोलिसांना हा सगळा प्रकार लक्षात आला. राजस्थानच्या उदमनाथ याच्याशी ती बोलत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सुनीताशी संपर्क साधला आणि तिला पलामूला बोलावून घेतले.
सुनीताला गावी परत बोलावल्यानंतर काही दिवसांनी तिचा प्रियकर उदमनाथ देखील तिच्या शोधात गावी पोहोचला. दोघांनी पोलीस ठाण्यात जाऊन लग्न केल्याचे सांगितले. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सुनीताच्या पतीलाही पोलीस ठाण्यात बोलावलं. आपापसांत सहमती झाल्यानंतर सुनीताला घटस्फोट देण्यास तिचा पती तयार झाला. त्यानंतर सुनीताला तिच्या प्रियकरासोबत जाण्यास परवानगी देण्यात आली. सुनीताला सहा आणि सात वर्षे अशी दोन मुले आहेत.