मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सोमय्या दाम्पत्यानं कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असून, संजय राऊत हे सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं सोमय्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सोमय्यांच्या वकिलांनी वॉरंट जारी करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर सोमय्या यांनी शिवडी कोर्टात धाव घेऊन राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे.
संजय राऊत हे वारंवार कोर्टात सुनावणीला गैरहजर राहत असल्यामुळे सोमय्या यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यावर राऊतांच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितला. त्यावर जोपर्यंत कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात येत नाही, तोपर्यंत राऊत हजर होणार नाहीत, असा युक्तिवाद केला.
राऊतांच्या वकिलांनी वेळ मागितला होता. कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली. तर सोमय्यांच्या वकिलांनी राऊतांविरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवडी कोर्टाने संजय राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.