पुणे : रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असते, परंतु कधीकधी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अपघाताच्या काही घटना या समोर येत असतात. आरपीएफ जवानांनी अनेकदा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. नुकतीच अशीच एक घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडलीय.
धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे या महिलेला जीवदान मिळाले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने मोठ्या शिताफीने या महिलेचा जीव वाचवला. या प्रकाराचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Enter a Twitter URL
पुण्यातील रेल्वे स्टेशनवर घडलेला प्रसंग पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, सीसीटीव्ही समोर आले आहे. #pune #train #ViralVideo pic.twitter.com/RqYF63Uopm
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) January 4, 2023
सकाळी सात वाजेच्या दरम्यान एक महिला आपल्या मुलीला घेऊन रेल्वे स्थानकावर आली होती. पण ज्या ट्रेनने महिलेला जायचे होते ती ट्रेन नुकतीच निघाली होती. घाईगडबडीत आलेली महिला आणि तीची मुलगी रेल्वे पकडण्यासाठी धावत होते. महिलेने मुलीला ट्रेनमध्ये बसवलं होतं. त्याच दरम्यान महिलेने आपल्याकडे असलेल्या बॅगाही आतमध्ये धावत असतांना टाकल्या होत्या. महिला धावत्या ट्रेनमध्ये उडी मारून बसणार त्याचवेळी महिलेचा पाय निसटून तोल गेला. यावेळी महिलेने ट्रेनला घट्ट धरून ठेवले होते. पण यावेळी महिलेचा पाय हा खाली अडकला होता. त्याच दरम्यान ट्रेनमध्ये बसलेल्या मुलीने जोरात किंचाळी ठोकली आणि तिथे जवळच असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्याने मोठ्या शिताफीने या महिलेला बाजूला करत तीचा जीव वाचवला. विनोदकुमार मीना असं या दक्ष कर्मचाऱ्याचं नाव आहे. या कामगिरीबद्दल विनोदकुमार मीना यांचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
स्टेशनवरील हा प्रसंग चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ही ट्रेनही थांबविली. याच दरम्यान महिलेच्या पायला किरकोळ दुखापत झाली होती.