नवी दिल्ली: आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र वाढती महागाई काही पाठ सोडत नाहीय. आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 24 ते 25.5 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1769 रुपये झाले आहेत.
कोलकात्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 24 रुपयाने वाढ करण्यात आली असून कोलकात्यातील गॅस सिलिंडरची किंमत 1869 रुपये झाली आहे. मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयाने महागल्याने आता मुंबईत 1721 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 25.5 पैशांनी महागले आहे. त्यामुळे चेन्नईत आता 1917 रुपयाला एक व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे
घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिल्लीत एक घरगुती गॅस सिलिंडर 1053, कोलाकात्यात 1079, मुंबईत 1052.50 आणि चेन्नईत 1068.50 रुपयात मिळणार आहे.
गॅस सिलिंडर बाबतची वेगळी माहिती
जुलै 2022 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जुलै 2022मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्या आधी वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली होती.