मुंबई : काही दिवसापूर्वीच टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. छत्तीसगडमधील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार लीना नागवंशी हिने आत्महत्या केली आहे. लीनाचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, लीना ही छत्तीसगड इथल्या रायगडच्या केलो बिहार कॉलनीत राहत होती. मंगळवारी तिचा मृतदेह घराच्या गच्चीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत लीनाच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह खाली उतरवला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. लीना नागवंशी ही बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.
लीनाच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तिने आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. लीनाचा कुणाशीही वाद नव्हता, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. मृत्युच्या अवघ्या २ दिवस आधी लीनाने सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला होता.