नागपूर : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी आमदार रवी राणा यांनी चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली. हे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला असल्याचा, असा दावा राणा यांनी यावेळी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
उमेश कोल्हे हत्याप्रकरणावरुन रवी राणा यांनी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला.
त्यासोबतच उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यातही तत्कालीन सरकारचा हात असल्यामुळे याप्रकरणाची आणि उद्धव ठाकरेंची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणीही राणा यांनी केली.
रवी राणांच्या मागणीवर सरकारकडून शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिले. उमेश कोल्हे हत्याप्रकरणाच्या चौकशी आजवर काय काय घडलं याचा विस्तृत अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल आणि तो येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात येतील असं शंभूराजे देसाई यांनी यावेळी जाहीर केलं. तसंच रवी राणा यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे खरंच याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेनं नेण्यासाठी दबाव आणण्यात आला का? पोलिसांना कुणी-कुणी फोन केले? याचा मुद्देसूद अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल, असे शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.