नवी दिल्ली : केंद्र सरकारने गरीब वर्गातील जनतेसाठी एक मोठा निर्णय घेऊन नवीन वर्षाची भेट दिली आहे, या निर्णयामुळे देशातील तब्बल ८१.३५ कोटी नागरिकांना लाभ होणार आहे.लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एक वर्षासाठी मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.
मंत्री श्री. गोयल म्हणाले की, या योजनेसाठी २ लाख कोटी रुपये खर्च होणार असून, तो आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार आहे. या कायद्यानुसार प्रतिकिलो २ ते ३ रुपये दराने प्रतिव्यक्तीस ५ किलोग्रॅम धान्य दरमहा देण्यात येते अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य सरकारकडून दिले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये गरिबांना तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये, तर गहू प्रतिकिलो २ रुपये दराने देण्यात येतो.
‘दरम्यान प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेनुसार गरिबांना अन्नधान्याचे मोफत वाटप केले जात असे. येत्या ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येणाऱ्या या योजनेला मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले.