जळगाव : पतीचा अपघातात मृत्यू झाल्याचा विरह सहन न झाल्याने पत्नीनेही पतीच्या मृत्यूनंतर सहाच दिवसांत आपली जीवनयात्रा संपविली आहे. संदीप रामभाऊ पाटील (वय ३४) असे मृत महिलेच्या पतीचे नाव होते. तर दिपाली ऊर्फ उज्ज्वला पाटील (वय-३०) असे आत्महत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान आठवडाभरातच वडिलांच्या पाठोपाठ आईनेही जगाचा निरोप घेतल्याने दोन चिमुकले पोरके झाले आहेत.
काय आहे घटना?
संदीप रामभाऊ पाटील हे बहाळ येथील वाहन व्यावसायिक होते. सुरत येथे लिंबू घेऊन जात असताना १० डिसेंबरला रात्री १०:४५ च्या सुमारास खडकी फाट्याजवळ त्यांच्या ट्रकची माल वाहतूक गाडीला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात संदीप रामभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. पती संदीप यांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या दिवसापासून त्यांची पत्नी दिपाली हिने अन्न पाणी त्याग केले होते. पतीच्या विरहाचा मोठा मानसिक धक्का दिपाली यांना बसला होता. त्यांची शुद्धही हरपली होती. त्यांना सांभाळण्याचे मोठे आव्हान कुटुंबासमोर उभे राहिले होते. मात्र नीयतीला काही वेगळेच मान्य होते. दिपाली यांनी कुटुंबापासून स्वतःला बाजूला सारून १६ डिसेंबरला पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केली.
हे देखील वाचा..
नवीन वर्षात येणार 1000 रुपयांची नवी नोट, 2 हजारांची नोट बंद होणार?
मोठी बातमी ; नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘हे’ २३ विधायके मांडले जाणार…
संदीप आणि दिपाली या दोघांना एक ७ वर्षे आणि दुसरा ९ वर्षे अशी दोन मुले आहेत. वडिलांना अग्नीडाग देवून दु:ख विसरत असताना या दोन्ही चिमुकल्यांवर आईच्या आत्महत्येच्या घटनेने पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मातृ-पितृछत्र कायमचे हरपल्याने दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. या हृदयद्रावक दुदैवी घटनेने बहाळ गावात आणि परिसरात मोठी हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे. १६ तारखेला मुलांनी आईलाही मोठ्या शोकाकुल वातावरणात मुखाग्नी दिला. दोन्ही मुलांचा आक्रोश बघून यावेळी अंत्ययात्रेला आलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले.